मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश युवकांपर्यंत तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ‘Reel for Soil & Water Conservation’ ही राज्यस्तरीय रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येणार आहे. रील अपलोड करण्याचा कालावधी १५ ते २१ ऑगस्ट आहे.
स्पर्धकांनी ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करून ती आपल्या Public Instagram Account वर पोस्ट करायची आहे. रीलच्या सुरुवातीला रीलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित अधिकृत Instagram Account ला Tag करून #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे.
मृद व जलसंधारण विभाग सोशल मीडिया अकाऊंट
मृद व जलसंधारण विभागाचे
Instagram - https://www.instagram.com/mahawalkathon2026/?hl=en,
Facebook - https://www.facebook.com/mahawalkathon2026/,
Twitter - https://x.com/MahaWalkathon26 हे सोशल मीडिया अकाऊंट आहेत.
Reel for Soil & Water Conservation
रीलसाठी माती संवर्धन, पाणी बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन तसेच गावातील यशस्वी मृद व जलसंधारणाची कामे असे विषय निवडता येणार आहेत. Storytelling, Acting, Music, Dance, Animation, Short Film, Before-After आणि Drone Visuals अशा सर्जनशील पद्धतींचाही वापर करता येईल. मात्र रीलचा मुख्य संदेश माती व पाणी संवर्धनाशी संबंधित असणे आवश्यक आहे.
रील पोस्ट केल्यानंतर विभागाने उपलब्ध करून दिलेल्या QR Code द्वारे नोंदणी करून रीलची लिंक सबमिट करणे आवश्यक आहे. उपलब्ध माहितीनुसार नोंदणी प्रक्रियेत जिल्हा निवड, रीलची पडताळणी आणि त्यानंतर सहभाग प्रमाणपत्राची प्रक्रिया आहे.
प्रत्येक जिल्ह्यातून तीन विजेत्यांची निवड केली जाणार असून प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये पुरस्कार देण्यात येणार आहेत. विजेत्यांना ‘युवा मृद-जलदूत’ म्हणून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार असून पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विजेते केवळ Likes किंवा Followersच्या संख्येवर निवडले जाणार नसून रीलचा संदेश, कल्पकता, सामाजिक प्रभाव, सादरीकरण आणि तांत्रिक गुणवत्ता यांचा विचार केला जाणार आहे.
युवक, विद्यार्थी, इन्स्टाग्राम क्रिएटर्स, यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
