Tomato Disease Management | टोमॅटोवरील करपा आणि फळसड रोगाचा प्रादुर्भाव वाढला; वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना करा

ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा

खरीप हंगामात टोमॅटो पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव(Tomato Disease Management)इतर हंगामांच्या तुलनेत अधिक प्रमाणात आढळून येतो. सध्या टोमॅटो पिकामध्ये लवकर येणारा करपा म्हणजेच अर्ली ब्लाइट आणि फळसड या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सततचा पाऊस, ढगाळ वातावरण आणि जास्त आर्द्रता यामुळे या रोगांना पोषक वातावरण मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करून रोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि त्यानुसार नियंत्रणाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

लवकर येणारा करपा हा अल्टरनेरिया सोलॅनी या रोगकारक बुरशीमुळे होतो. या रोगाची सुरुवात जमिनीलगतच्या पानांवर लहान आकाराचे गोलाकार ते आकारहीन, तपकिरी ते काळपट रंगाचे ठिपके दिसण्यापासून होते. रोगाचा प्रादुर्भाव वाढत गेल्यास हे वलयांकित ठिपके एकमेकांत मिसळतात आणि पानांवर मोठ्या आकाराचे तपकिरी चट्टे तयार होतात. परिणामी पाने करपून गळून पडतात. पानांप्रमाणेच खोडावरही गर्द तपकिरी डाग पडतात. त्यामुळे फांद्या कमकुवत होऊन मोडू शकतात. हिरव्या किंवा पिकलेल्या फळांवरदेखील तपकिरी ते काळ्या रंगाचे वलयांकित डाग दिसून येतात.

टोमॅटो पिकातील दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे फळसड. फायटोप्थोरा निकाशियाना पॅरासीटिका आणि फायटोप्थोरा कॅपसिकी या बुरशीमुळे ‘बक आय रॉट’ नावाचा रोग होतो. हा विशेषतः खरीप हंगामात आढळणारा रोग आहे. सततचा पाऊस, ढगाळ वातावरण आणि जास्त आर्द्रता असल्यास जमिनीलगतच्या फांद्या आणि फळांवर या रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसतो. हिरव्या फळाच्या टोकाच्या बाजूला बदकाच्या डोळ्यासारखे फिकट तपकिरी रंगाचे डाग तयार होतात. सुरुवातीला लहान असलेले हे डाग नंतर संपूर्ण फळावर पसरतात. फळातील गर रंगहीन होतो, रोगग्रस्त साल कातड्यासारखी होते आणि जुनी फळे सडतात. या रोगाचा प्रसार हवा आणि पाण्याद्वारेही होतो.

टोमॅटोवरील प्रमुख रोग आणि लक्षणे : Tomato Disease Management

रोगप्रमुख लक्षणे
लवकर येणारा करपापानांवर तपकिरी-काळपट वलयांकित ठिपके, पाने करपणे, फळांवर डाग
बक आय रॉटफळाच्या टोकाला बदकाच्या डोळ्यासारखे फिकट तपकिरी डाग
कोलेटोट्रीकम फळसडपिकलेल्या फळांवर पाणथळ, खोलगट ठिपके आणि काळपट बुरशी
फोमाहिरव्या फळांवर तपकिरी ते काळे डाग, पिकलेल्या फळांवर खोलगट डाग
फ्युजॅरियम फळसडफळांवर फिकट तपकिरी, पाणथळ डाग आणि पांढरी बुरशी

हेही वाचा : ‘Reel for Soil & Water Conservation’ स्पर्धा; १५ ते ३० वयोगटातील युवकांना संधी

Cotton Processing | कापूसटंचाईचा जिनिंग-प्रेसिंग उद्योगाला मोठा फटका; खानदेशातील अनेक कारखाने महिनाभर आधीच बंद

कोलेटोट्रीकम या रोगकारक बुरशीमुळे पिकलेल्या फळांवर लहान, पाणथळ, गोलाकार आणि खोलगट ठिपके पडतात. या ठिकाणी काळपट बुरशीची वाढ दिसते. ढगाळ हवामानात या रोगाचे प्रमाण वाढू शकते आणि प्रादुर्भाव झालेली फळे सडतात. फोमा बुरशीच्या प्रादुर्भावामुळे हिरव्या फळांवर सुरुवातीला तपकिरी आणि नंतर काळे डाग पडतात. पिकलेल्या फळांवर खोलगट कातड्यामुळे डाग पडून फळे सडतात. त्याचप्रमाणे फळे जमिनीला टेकल्यास आणि सतत किंवा जोराचा पाऊस तसेच जास्त आर्द्रता असल्यास फ्युजॅरियम बुरशीचा प्रादुर्भाव पिकलेल्या फळांवर होऊ शकतो. अशा वेळी फळांवर फिकट तपकिरी डाग पडतात. हे डाग पाणथळ होऊन त्यावर पांढरी बुरशी वाढते आणि फळे सडतात.

करपा आणि फळसड नियंत्रणासाठी उपाय

टोमॅटो पिकामध्ये रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकाची फेरपालट करणे महत्त्वाचे आहे. टोमॅटो पिकानंतर बटाटा, मिरची, वांगी किंवा पुन्हा टोमॅटोचे पीक घेऊ नये. लागवडीसाठी निरोगी बियाण्याचा वापर करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. रोपवाटिकेत मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी आणि त्यानंतर 10 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

लागवडीच्या वेळी जमिनीत ट्रायकोडर्मा पावडर 2 किलो प्रति एकरी या प्रमाणात शेणखतात मिसळून घ्यावी. झाडांवरील तसेच जमिनीवर पडलेली रोगग्रस्त फळे आणि पाने गोळा करून जमिनीत गाडावीत किंवा जाळून नष्ट करावीत. हे रोगग्रस्त अवशेष बांधावर किंवा टोमॅटोच्या प्लॉटच्या शेजारी टाकू नयेत.

पिकामध्ये रोगाची लक्षणे दिसताच मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड 25 ग्रॅम किंवा ॲझॉक्सिस्ट्रॉबिन 10 मिलि प्रति 10 लिटर पाणी यापैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्यानंतर आवश्यकतेनुसार 10 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 फवारण्या कराव्यात. अशा प्रकारे सुरुवातीपासून योग्य व्यवस्थापन आणि नियमित पिक पाहणी केल्यास टोमॅटोवरील करपा आणि फळसड रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.


ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा