मुसळधार पावसाचा इशारा! कोकणातील शेतकऱ्यांनी तातडीने घ्या ‘ही’ काळजी; कृषी विभागाचा सल्ला.. | Konkan Agriculture Crop Advisory

ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा

किसानवाणी : कोकण विभागातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण पीक सल्ला (Konkan Agriculture Crop Advisory) जारी केला असून आगामी काळात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता लक्षात घेऊन विविध पिकांसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे. विशेषतः नव्याने लागवड केलेल्या सुपारी व नारळाच्या रोपांचे तसेच आंबा आणि काजू कलमांचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी त्यांना काठ्यांचा आधार देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

भात पिकाच्या बाबतीत रोपवाटिका व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे. ज्या भागात रोपवाटिका पेरणी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्या ठिकाणी गादीवाफ्यावर पेरणी तातडीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रोपवाटिकेची चांगली वाढ होण्यासाठी प्रति गुंठा १ किलो युरिया, ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८५० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा ३.३३० किलो १५:१५:१५ मिश्र खत जमिनीत मिसळून द्यावे. खतांचा थेट संपर्क बियाण्याशी येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

भात बियाण्यांची पेरणी करण्यापूर्वी प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी. पेरणी १० सेंटीमीटर अंतरावर ओळींमध्ये आणि सुमारे २.५ सेंटीमीटर खोलीवर करावी. बारीक दाण्याच्या जातींसाठी प्रति गुंठा ४ किलो, जाड दाण्याच्या जातींसाठी ६ किलो आणि संकरित जातींसाठी २ किलो बियाणे वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे. पेरणीनंतर १५ दिवस पूर्ण झालेल्या रोपवाटिकेस प्रति गुंठा १ किलो युरिया खताचा दुसरा हप्ता देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

भात रोपवाटिकेसाठी शिफारसी : Konkan Agriculture Crop Advisory

बाबशिफारस
बीजप्रक्रियाथायरम २.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे
ओळीतील अंतर१० सें.मी.
पेरणी खोली२.५ सें.मी.
बारीक दाण्याचे बियाणे४ किलो प्रति गुंठा
जाड दाण्याचे बियाणे६ किलो प्रति गुंठा
संकरित बियाणे२ किलो प्रति गुंठा
दुसरा युरिया हप्ता१ किलो प्रति गुंठा

रोपवाटिका लवकर तयार करण्यासाठी मोड आलेल्या भात बियाण्यांची म्हणजेच ‘रहू पद्धती’ची शिफारस करण्यात आली आहे. यासाठी बियाण्यांची गोणी २४ तास पाण्यात पूर्णपणे बुडवून ठेवावी आणि नंतर सावलीत १२ ते २४ तास ठेवल्यास बियाण्यांना मोड येतात. या मोड आलेल्या बियाण्यांची गादीवाफ्यावर पेरणी केल्यास एकसारखी उगवण आणि निरोगी रोपांची वाढ होते. तसेच रोपवाटिकेत पाणी साचणार नाही यासाठी योग्य निचऱ्याची व्यवस्था ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

नागली आणि वरी पिकांच्या रोपवाटिकांची पेरणी अद्याप बाकी असलेल्या भागात गादीवाफ्यावर पेरणी सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम थायरम चोळावे तसेच प्रति गुंठा १ किलो युरिया खताचा वापर करावा. एका हेक्टर क्षेत्रासाठी ५ ते ६ किलो बियाणे पुरेसे असल्याचे कृषी तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

फळबाग लागवडीसाठीही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नवीन आंबा लागवडीसाठी ९ ते १२ महिने वयाची आणि ३ ते ३.५ फूट उंचीची निरोगी कलमे निवडावीत. काजू लागवडीसाठी ६ ते ८ महिने वयाची आणि २ ते २.५ फूट उंचीची मृदूकाष्ठ कलमे वापरण्याचा सल्ला आहे. लागवडीदरम्यान मातीचा गोळा न तुटू देता पॉलिथिन पिशवी सावधपणे काढणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

नवीन नारळ व सुपारी लागवडीसाठी १२ महिन्यांपर्यंत वयाची, ८ ते १० विकसित झावळ्या असलेली निरोगी रोपे निवडावीत. तसेच दर्जेदार रोपे किंवा कलमे कृषी विद्यापीठांच्या रोपवाटिकांमधून किंवा राष्ट्रीय बागवानी मंडळाकडून दर्जा प्राप्त रोपवाटिकांमधून खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये काकडी, चिबूड, पडवळ, दोडका, कारले, लाल भोपळा, दुधी भोपळा आणि घोसाळी यांच्या पेरणीची कामे त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक आळ्यात २ किलो शेणखत आणि ५० ते ६० ग्रॅम मिश्रखत देण्याची शिफारस करण्यात आली आहे. रोपावस्थेतील मर व खोडकुज या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक २ ग्रॅम प्रति आळे या प्रमाणात शेणखतामध्ये मिसळून वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

याचबरोबर कृषी क्षेत्रातील एक आगळावेगळा प्रयोगही चर्चेत आला आहे. चीनमधील तियानफू ग्रॅनरी नॅशनल मॉडर्न अॅग्रिकल्चरल इंडस्ट्रियल पार्क येथे भातशेतीत विविध रंगांच्या भात वाणांचा वापर करून भव्य पांडा कलाकृती साकारण्यात आली आहे. फिकट आणि गडद हिरव्या रंगांच्या भात जातींच्या मदतीने तयार झालेली ही प्रतिमा ड्रोनमधून पाहिल्यावर स्पष्टपणे दिसते. या अनोख्या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक आकर्षित होत असून स्थानिक शेतकऱ्यांना पर्यटन, कृषी प्रदर्शन आणि स्थानिक उत्पादनांच्या विक्रीतून अतिरिक्त उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होत आहेत.


ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा